Ad will apear here
Next
अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर आणि परिसर...
अंबरनाथचे शिवमंदिर

‘करू या देशाटन’
सदराच्या गेल्या भागात आपण ठाणे जिल्ह्यातील पारसिक हिलपासून सिद्धगड-माळशेज घाटापर्यंतची पर्यटनस्थळे पाहिली. आजच्या भागात पाहू या उल्हासनगरपासून मुरबाडपर्यंतची पर्यटनस्थळे. 
.........
उल्हासनगरपासून मुरबाडपर्यंतचा भाग औद्योगिकदृष्ट्या विकसित झालेला आहे. हा भाग अतिशय निसर्गरम्य आहे. एक हजार वर्षांपूर्वी या भागात वैभवसंपन्न शिलाहार राजवट होती. शिलाहार राजवटीचे आणि तत्कालीन संस्कृती व वैभवाचे प्रतीक म्हणजे अंबरनाथचे शिवमंदिर...

अंबरनाथचे शिवमंदिर : अंबरनाथ येथील शिवमंदिर हे महाराष्ट्रातील शिल्पकलेचा जणू खजिनाच आहे. अंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराचा समावेश ‘युनेस्को’ने जाहीर केलेल्या २१८ कलासंपन्न वास्तूंमध्ये होतो. 

अंबरनाथचे शिवमंदिर

वालधुनी नदीच्या काठावरील, हेमाडपंती शैलीतील हे मंदिर सन १०२२ ते १०६० या कालावधीमध्ये बांधून पूर्ण झाले. शिलाहार घराण्यातील छित्तराज याने १०२२ ते ३५ या काळात हे मंदिर बांधण्यास सुरुवात केली. त्याचा धाकटा भाऊ माम्वाणी राजाच्या काळात सन १०६०मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. हे मंदिर वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना समजले जाते. 

अंबरनाथचे शिवमंदिर हे संपूर्ण भारतवर्षातील पहिले भूमिज मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर  शिल्पशास्त्राप्रमाणे सप्तांग भूमिज पद्धतीत मोडते. भूमिजशैली ही नागरशैलीची उपशैली समजली जाते. या मंदिराच्या पायाच्या कोनांची संख्या सात आहे. एकावर एक असे सात भूमी (म्हणजे शिल्प रांगा) रचण्यात आले होते; मात्र कालांतराने गाभाऱ्यावरील शिखर नष्ट झाल्यामुळे तीनच भूमी (शिल्प रांगा) शिल्लक आहेत. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराची रचना या मंदिराचा अभ्यास करून करण्यात आली आहे असे म्हणतात. 

अंबरनाथचे शिवमंदिर

मंदिराचे प्रमुख प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख असून त्याशिवाय आणखी दोन प्रवेशद्वारे आहेत. मंदिराच्या प्रवेशदाराजवळ एक शिलालेख आहे. रॉयल एशियाटिक सोसायटीच्या एका खंडात इ. स. १०६०च्या शिलालेखाचा उल्लेख आहे. मंदिराचे गर्भागृह हे सभामंडपापेक्षा थोडे खोलगट जागी आहे. छत व कळस यामध्ये पोकळी ठेवलेली आहे. कोनात जोडलेल्या गाभाऱ्यामुळे ऊन-सावल्यांचे वेधक दृश्य पाहायला मिळते. मंदिरासमोरील नंदीमंडप व संरक्षक भिंत अस्तित्वात नाही. 

या मंदिरात श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी असते. गाभाऱ्याच्या दरवाज्यावरील गणेशपट्टावरच्या भागात शिव, सिंह आणि हत्ती यांच्या सुरेख आकृती कोरलेल्या आहेत. सभामंडप सर्व बाजूंनी बंद आहे. मंडपाच्या मध्यभागी चार खांबांवर आधारलेले एक घुमटाकृती छत असून त्याच्या मध्यभागी झुंबर आहे. या घुमटाच्या आतील भागावर एकाखाली एक वर्तुळे कोरलेली आहेत. पाण्यावर टाकलेल्या दगडामुळे जशा लहरी उमटतात तशी ती दिसतात. मंडपातील खांबांवर अनेक शिल्पाकृती साकारल्या आहेत. त्यांची संख्या ७०च्या आसपास आहे. विविध मुद्रांमधील शंकर-पार्वतीच्या मूर्ती सुबकपणे कोरलेल्या आहेत. 

मंदिराच्या बाहेरील बाजूसही भिंतीवर असंख्य शिल्पे कोरलेली पाहायला मिळतात. या मंदिरातील शिल्पामध्ये आठ हात असलेली एक अतिशय सुरेख अशी कामदेवाची मूर्ती आहे. ती अत्यंत सुबकपणे कोरलेली असून, कामदेवाचे शरीरसौष्ठव, अलंकार सुस्पष्टपणे आणि नाजूकपणे कोरलेले आहेत. या मंदिरातील एका मूर्तीच्या मांडीवर आणखी एक स्त्री प्रतिमा कोरली आहे. तिला तीन तोंडे असल्यामुळे तिला त्रिमुखी मूर्ती म्हणतात. या मंदिरातील शिवलिंग स्वयंभू असून, शिवलिंगाऐवजी फक्त एक उंचवटा आहे. या शिवलिंगाला ‘अंबरेश्वर’ म्हणूनही ओळखले जात़े. याच मंदिराच्या नावावरून शहराला अंबरनाथ हे नाव पडले आह़े. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या प्राचीन शिवमंदिरात महादेवाच्या स्वयंभू पिंडीचे दर्शन घेण्यासाठी स्थानिकांसह लांबून आलेल्या भाविकांच्या मंदिर परिसरात रांगा लागलेल्या दिसतात. वर्षभरातील इतर सोमवारच्या तुलनेत श्रावणातील सोमवारी येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते. अंबरनाथ रेल्वे स्टेशनपासून साधारण एक किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. 

अंबरनाथ : अंबरनाथ हे फार पूर्वीपासून औद्योगिक ठिकण आहे. पूर्वी येथे काडेपेटीचा व खताचा कारखाना होता. त्यावर अंबरनाथचे आर्थिक गणित अवलंबून होते. काडेपेटीच्या कारखान्यात सध्या नाममात्र उत्पादन होते. तेथे कॉस्मेटिक्स उत्पादने चालू आहेत. खत कारखाना पूर्ण बंद झाला. अर्थात काही नव्यानेही सुरू झाले. अंबरनाथ येथे लष्कराचा दारूगोळा कारखाना (ऑर्डनन्स फॅक्टरी) आहे. बॉम्बची कव्हर्स येथे बनवली जातात.

प्रसिद्ध नाटककार बाळ कोल्हटकर हे अंबरनाथचे रहिवासी होते. त्यांचा बंगला अजूनही अंबरनाथमधील खेर विभागात आहे. ग्रंथाभिसरण मंडळ नावाचे पन्नास वर्षांहूनही जुने वाचनालय. त्याचे ग्रंथाभिसरण मंडळ हे नाव भारताचे पहिले केंद्रीय अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी ठेवलेले आहे. 

काकोळे रेल्वे धरण/जीआयपी डॅम : अंबरनाथजवळ इंग्रज राजवटीत सुमारे शंभर वर्षांपूर्वी बांधलेले हे धरण कल्याण जंक्शनला इंजिनाला पाणी पुरविण्यासाठी बांधले होते. आता तेथील शुद्ध केलेले पाणी रेल्वेमध्ये रेलनीर म्हणून वितरित करण्यात येते. २७ जुलै २०१९ रोजीच्या अतिवृष्टीमुळे या धरणाचे नुकसान झाल्याची बातमी हा लेख लिहीत असतानाच आली आहे. 

नेवाळी विमानतळ : याला कल्याण विमानतळ असेही म्हणतात. दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी हा विमानतळ उभारला होता. त्यासाठी १८०० एकर जमीन संपादित केली होती. मुंबईच्या पर्यायी विमानतळासाठी या जागेचा प्रस्ताव विचाराधीन होता; पण आंतरराष्ट्रीय निकषामध्ये ही जागा योग्य नसल्याने नवी मुंबई येथील जागेचा प्रस्ताव मंजूर झाला. सध्या ही जागा संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे. यावर अतिक्रमण झाल्याने तेथे कुंपण बांधायचे काम सुरू आहे. यातील काही भाग भाभा अणुसंशोधन केंद्राकडून (बीएआरसी) संशोधनकार्यासाठी वापरला जातो. उल्हासनगरच्या दक्षिणेला मलंगगडाच्या बाजूला हे ठिकाण आहे. 

चिखलोली धरणचिखलोली धरण : अंबरनाथ ही एकमेव नगर परिषद आहे, जिच्याकडे स्वत:च्या मालकीचे धरण आहे. अंबरनाथ शहरातील पूर्व भागाला प्रति दिन सहा दशलक्ष घनमीटर पाणी या चिखलोली धरणातून दिले जाते. अंबरनाथ नगरपालिकेला पाणीपुरवठा करणारे हे धरण पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. 

उल्हासनगर : हे ठिकाण पूर्वी कल्याण मिलिटरी ट्रान्झिट कॅम्प म्हणून ओळखले जायचे. फाळणीनंतर पाकिस्तानमधील सिंध प्रांतातून आलेल्या एक लाखाहून अधिक सिंधी हिंदू निर्वासितांसाठी येथे वसाहत उभारण्यात आली. आठ ऑगस्ट १९४९ रोजी या ठिकाणाचे नाव उल्हासनगर ठेवण्यात आले. सन १९६०मध्ये नगरपालिकेची स्थापना झाली व १९६५मध्ये पहिल्यांदा निवडणूक घेण्यात आली. आता या नगराला महानगरपालिकेचा दर्जा देण्यात आला आहे.

झुलेलाल मंदिर, उल्हासनगरनिर्वासित झालेल्या सिंधी बांधवांनी फाळणीचे दुःख विसरून कष्ट करून आपला जीवनगाडा पुढे चालूच ठेवला. कष्ट करायच्या उर्मीतून हे गाव उद्योगनगरी म्हणून पुढे आले. (लोक गमतीने म्हणतात, की मेड इन यूएसए म्हणजे उल्हासनगर सिंधी असोसिएशन.) इलेक्ट्रॉनिक वस्तूपासून कापडनिर्मितीपर्यंतचे वेगवेगळे अनेक उद्योग सिंधी लोकांनी केले. येथील जीन्स निर्यात होतात. उल्हासनगर ही रेडिमेड कपड्यांची मोठी व्यापारी पेठ झाली आहे. तयार फर्निचरसाठीही उल्हासनगर प्रसिद्ध झाले आहे.
 
झुलेलाल मंदिर : उल्हासनगर येथे सिंधी लोकांची मोठी वस्ती असल्याने सिंधी लोकांचे श्रद्धास्थान असलेले झुलेलाल मंदिर हेही उल्हासनगरचे आकर्षण आहे. येथे सिंधी लोकांचे सर्व धार्मिक सण उत्साहाने साजरे केले जातात. त्या वेळी आकर्षक रोषणाई केली जाते. 

बिर्ला मंदिर, शहाड

शहाड विठ्ठल मंदिर :
उल्हासनगरमध्ये असलेल्या शहाड भागात सेंच्युरी रेयन कंपनीच्या जवळ हे मंदिर एका छोट्या टेकडीवर असून, बिर्ला यांनी बांधले आहे. श्री विठोबाची काळी दगडी मूर्ती एका लहान मुलाच्या रूपात येथे आहे. मंदिरात विठोबाच्या मूर्तीव्यतिरिक्त देवी रुक्मिणी, लक्ष्मी, भगवान नारायण आणि भगवान गणेश यांच्या मूर्ती आहेत. मंदिरातील सर्वांत प्रमुख मूर्ती भगवान विष्णू आणि त्याच्या दहा अवतारांची आहे. देवालय सर्व बाजूंनी सुंदर दिसते. मंदिरातील मूर्ती आणि नक्षीकाम अतिशय आखीवरेखीव आहे. बिर्ला मंदिराची वास्तुकला अत्यंत सुंदर असून, त्याच्या भिंतींवर विविध शिल्पे सजविण्यात आली आहेत. मंदिरातील सर्व शिल्पे बघणाऱ्याला खिळवून ठेवतात इतकी आकर्षक आहेत. दाक्षिणात्य शैलीची छाप असलेले हे मंदिर संपूर्ण संगमरवरात बांधले आहे. येथे सर्व धार्मिक उत्सव साजरे केले जातात. मंदिराच्या समोर एक सुंदर, स्वच्छ बगीचा आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी येथे सुविधा आहेत. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला कमानीवर कोरीव गरुडप्रतिमा असून, ती नक्षीकामाने सुशोभित केली आहे. 

विठ्ठल मंदिर शिल्प

बदलापूर :
बदलापूर रेल्वे स्थानकापासून बदलापूर जवळपास पाच किलोमीटर अंतरावर आहे. पूर्वी बदलापूर-सुरतमार्गे कोकण आणि गुजरातदरम्यान दळणवळणाचा रस्ता होता. उत्तम प्रजातींच्या घोड्यांसाठी हे शहर प्रसिद्ध होते. कोकण प्रदेशातील कठीण चढाईसाठी शिवाजी महाराजांचे योद्धे येथे घोडे बदलायचे. यावरूनच हे शहर बदलापूर या नावाने ओळखले जाऊ लागले. १९७१ साली बदलापूर या शहरात नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. उल्हास नदीकिनारी वसलेल्या या शहराला कुळगाव-बदलापूर या नावानेसुद्धा ओळखले जाते. निसर्गरम्य माथेरान पर्वतरांगेच्या पायथ्याशी हे गाव आहे. पावसाळ्यामध्ये दक्षिण-पूर्व दिशेला असणाऱ्या माथेरान पर्वतरांगेतून पडणाऱ्या असंख्य धबधब्यांमुळे या भागाचे सौंदर्य खुलत असते. 

विठ्ठल मंदिर स्वागत कमान

मी १९७१ साली कुळगाव येथे माझ्या आत्याच्या घरी गेलो होतो. त्या वेळी तेथे कोकणी पद्धतीची घरे व शांत वातावरण होते. आता मात्र वातावरण पूर्ण बदलले आहे. सिमेंटची जंगले वाढत आहेत. बहुसंख्य कामगार वस्ती आहे. तरीही बदलापूरच्या आसपासचा भाग अजूनही निसर्गाने नटलेला दिसतो. आजमितीला बदलापूर शहरात जुने बदलापूर गाव, कुळगाव, मांजर्ली, बेलवली, वालवली, वडावाली, कात्रप आणि अनेक छोट्या गावांचा समावेश झाला आहे. 

या गावात पुढीलप्रमाणे अनेक मंदिरे आहेत. शिवमंदिर (शांतिनगर), गणपती मंदिर (बदलापूर गाव), गावदेवी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, दत्तमंदिर, श्रीराम मंदिर, वडवली शिवमंदिर, हनुमान मंदिर (गांधी चौक), मारुती मंदिर (मांजर्ली गाव), राम मंदिर (बेलवली गाव)

धनगर धबधबा : माथेरान डोंगर भागातील नवरा-नवरीच्या डोंगरपायथ्याशी हा धबधबा आहे. बदलापूरपासून तो आठ किलोमीटरवर आहे. येथे वातावरण खूपच थंड असते. जवळपास असणाऱ्या जंगलामुळे या ठिकाणचे सौंदर्य खुलून दिसते. एक दिवसाच्या वर्षा सहलीसाठी हे उत्तम ठिकाण आहे. मुख्य म्हणजे येथील पाण्याचा प्रवाह सुरक्षित असल्याने मनसोक्त मजा घेता येते. 

कोंडेश्वर मंदिर व धबधबा : कोंडेश्वर धरणाच्या जलाशयाच्या मागे हे सुंदर ठिकाण आहे. तेथे कोंडेश्वराचे मंदिर आहे. येथील परिसर अत्यंत शांत आणि सुंदर आहे. हे ठिकाण शहरी प्रदूषणापासून दूर आहे. मान्सूनच्या काळात फिरण्यासाठी कोंडेश्वर ही एक अतिशय सुंदर जागा आहे; मात्र येथील पाण्याचा प्रवाह धोकादायक आहे. मंदिराला लागूनच धबधबा आहे आणि धबधब्याच्या खाली एक डोह आहे. 

कान्होर गजानन महाराज मंदिरकान्होर गजानन महाराज मंदिर : हे ठिकाण बदलापूर शहराच्या बाहेर असून, बदलापूर येथील भाविकांचे आवडते ठिकाण आहे. सर्वत्र हिरव्यागार वनश्रीने नटलेल्या एका लहान टेकडीवर हे मंदिर बांधलेले आहे. 

मुळगाव : बदलापूरपासून सहा किलोमीटर अंतरावर एका डोंगरावर हे निसर्गरम्य ठिकाण असून, येथे श्री खंडोबाचे मंदिर आहे. मंदिरापासून बदलापूर, कुळगाव व वांगणीचे विहंगम मनोहर दृश्य दिसते. 

मुरबाड : मुरबाड हे मुंबईकरांचे वीकेंड ट्रिपचे आवडते ठिकाण आहे. पावसाळ्यात हा प्रदेश हिरवाईने नटलेला असतो आणि अनेक धबधबे येथे असतात. माळशेज घाटही याच भागात आहे. आसपास सिद्धगड, आजोबा यांसारखी पदभ्रमंतीची ठिकाणे आहेत. तसेच या भागात अनेक रिसॉर्टस् आहेत. अनेक वर्षांची रेल्वेची मागणी आता मंजूर झाली असून, सुमारे २८ किलोमीटरच्या मार्गासाठी ७२६ कोटी ४५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. या मार्गावर तीन मोठे पूल उभारण्यात येणार असून, ३९ छोटे पूल आहेत. पाच रेल्वे उड्डाणपूल व १० भुयारी मार्गिका तयार केल्या जाणार आहेत. या मार्गाचे काम ३१ मार्च २०२३पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. मुरबाड-नगर-मुंबई हमरस्त्यावरील हे एक प्रमुख ठिकाण आहे.  

मुळगाव येथील श्री खंडोबाचे मंदिरमुरबाडच्या आसपास : ट्रेकर्सचे नंदनवन असलेल्या या तालुक्यात. नाणेघाट, जिवधन, खडा पारशी, गडदचा गणपती, दाऱ्या घाट, गोरखगड, मच्छिंद्रगड, आहुपे घाट (आहुपे - भीमाशंकर) इत्यादी ट्रेकर्सच्या आवडीची ठिकाणे आहेत. 

मामणोली : येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वनवासी कल्याण आश्रमाचे मोठे केंद्र आहे. 

सरळगाव : येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर, म्हणजेच विक्रम सावरकर यांचे चिरंजीव यांची ‘महाराष्ट्र मिलिटरी स्कूल’ नावाची सैनिकी शाळा आहे. तसेच येथील डॉ. म्हसकर यांचे गुलाब उद्यान प्रसिद्ध आहे. 

विठ्ठल मंदिरम्हसा : या गावात दर वर्षी फार मोठी जत्रा भरते. यातील गुरांचा बाजार फार प्रसिद्ध आहे. अनेक जातिवंत जनावरे या ठिकाणी विक्रीसाठी आणली जातात. 

टोकावडे : आदिवासींनी जमवलेला रानमेवा, वनौषधींचे एक मोठे प्रदर्शन येथे भरविले जाते. 

कसे जाल उल्हासनगर अंबरनाथ परिसरात?
अंबरनाथ व उल्हासनगर ही ठिकाणे मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर आहेत. तसेच रस्त्याने जोडलेली आहेत. कल्याण-नगर हमरस्ता या भागातून जातो. मुंबईहून बदलपूरपर्यंत रेल्वेची लोकल सेवा उपलब्ध आहे. या भागात माळशेज घाटापर्यंत अनेक रिसॉर्टस् झाली आहेत. तसेच उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड येथे अनेक हॉटेल्स आहेत. अति पावसाचा जुलै महिना सोडून वर्षभर कधीही पर्यटनास जाण्यास ही ठिकाणे चांगली आहेत.

(या भागातील माहितीसाठी राजू सोनार, मिलिंद जोशी, सुहास वारले आणि अरुण मणेरीकर यांचे सहकार्य मिळाले.)  

- माधव विद्वांस

ई-मेल : 
vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZEVCC
 मस्त माहिती1
 फारच उपयुक्त व अभ्यासपुर्ण माहिती1
 अतिशय चांगली माहिती..आपल्याच वावरात असणार्या या ठिकाणांवर दल आपल्याला काहीच माहिती नसते..आपल्या लिखाणामुळे बरीच माहिती मिळते.1
Similar Posts
भिवंडी, शहापूर परिसराचा फेरफटका.. ‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण कल्याण-डोंबिवली परिसरातील पर्यटनस्थळांची माहिती घेतली. आजच्या भागात माहिती घेऊ या महाराष्ट्राचे मँचेस्टर मानले जाणाऱ्या भिवंडी व शहापूर भागात.
कल्याण-डोंबिवली परिसरातील पर्यटनस्थळे ‘करू या देशाटन’ या सदराच्या गेल्या भागात आपण ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर, अंबरनाथ आदी परिसरातील पर्यटनस्थळे पाहिली. आजच्या भागात पाहू या कल्याण-डोंबिवली परिसरातील पर्यटनस्थळे...
मीरा-भाईंदर परिसराचा फेरफटका ‘करू या देशाटन’ सदराच्या मागील भागात आपण ठाणे शहराची माहिती घेतली. आजच्या भागात ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर परिसरातील पर्यटनस्थळांची माहिती घेऊ या.
ठाणे शहराची सहल... ‘करू या देशाटन’ सदराच्या मागील १० भागांत आपण रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती घेतली. आजपासून पाहू या ठाणे जिल्ह्यातील ठिकाणे. सुरुवात ठाणे शहरापासून...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language